मोऱ्या... एक हमसफ़र !

तिन्ही संध्याकाळची वेळ...
लोकं शिवारातली कामं उरकून घराच्या दिशेने झपा झप पावलं टाकीत अंतर कापत होती.बायका डोक्यावर वैरणीची वझी,कुणी वाळलेल्या जळ्नाच्या मोळ्या तर काही बाया हातात एखादी शेळी,डोक्यावर फोकाने वळलेली मोकळी पाटी(घमेली)व त्यात न्याहारीच्या जेवनाची रिकामी भांडी इत्यादी 
घेऊन लगबगीने घराकडं जात होत्या.
दिवसभर कामाच्या व्यापाने वैतागून गेलेल्या बायका गळ्यात लोढ़ना असल्यानं हळू चालणाऱ्या गुराढोरांना शिव्या घालत होत्या.तर.. कर्ड्याच्या ओढीने पळणाऱ्या शेळीला दाव्यान झिंजडून कामाचा राग काढत होत्या.गडी माणसं औताबरोबर खांदयावर चाबूक टाकून मेटांगळ्यावर वैरणीचा भारा सावरून आपापल्या घरी चालले होते.
हे सगळ रस्त्यावरचं दृष्य..औतांचा आवाज,जनावरांच्या गळ्यातील घंटा,तिन्ही सांजेला किरकिरणारं रातकिडं, जनावराच्या खुरांचाआवाज,ओढयाच्या कुपाटित केकाटनाऱ्या केकाट्या,आणि अचानक कानाव येणारा टिटवीचा टाहो..मन सुन्न करत होता.घरामागच्या आंब्यावर मधेच घुमणारी ती घुबड काळजात चर्र करून टाकायची.
शिवारातून गावात जाताना रस्त्यावर पहिलचं घर आमच असल्यामुळे..आख्या गावातील लोक शिवारातून घराकडे जाताना रस्त्यावरील औतां बैलगाडी सहित माणसांच्या कोल्हापुरी चपलांचे आणि ढोरांच्या खुरांचे आवाज कधी नव्हे ते माझ्या कानठळ्या बसवीत होते.
म्हातारीनं(आज्जी)सोप्यातल्या चुलिबशी दिव्याची काजळी उडवली आणि वात मोठी करुन उजेड मोठा केला.लाईटचा काही भरवसा नाही म्हणून मुद्दाम दिवा लावूनच ठेवला.
आईला आज काय अन्नाचा घास घस्यासाली उतरणार नव्हता; पण जबादारीने आमच्यासाठी तिला भाकऱ्या थापाव्याच लागणार होत्या.
मी आपला आजोबाच्या काळातल्या जुनाट दणकट सागवानी माच्यावर दोनी हातावर हनुवटी ठेवून पालता पडलो होतो.
रस्त्यावरचे आवाज पुन-पुन्हा कानात टोचत होते.याचं कारण.. एवढंच होतं की ते शेतकऱ्याच्या घरचे मंजुळ,प्रसन्न,आपलासा वाटणारे बैलगाडी,औत,चाबूक,घंटीचे आवाज,आणि मोऱ्याचे फुत्कार हे सर्व काही आमच्यासाठी कायमचं बंद होणार होतं.
म्हातारीला आज जे घडलंय त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं ती आपली तात्याची वाट बघत बसली होती.
हळू-हळू रस्त्यावरचे सगळे आवाज कमी झाले.
मुरगाडीला(गावच्यापश्चिम दिशेचा डोंगर) गेलेल्या सूर्याने लाली संपवून उद्यासाठी आपला कारभार आटोपला होता.
सगळी चिमणी पाखरं आपापल्या घरी विसावली होती. कडूसं पडत आल्यानं शिवारातली एकुणएक माणसं घराकडे आली होती.तिन्हीसांजेच्या किड्यांनी नुसती किरकिर लावली होती.
मधेच पाल चुकचुकत होती; तस..माझ्या मनाच्या बेटावर विचारांची त्सुनामी धड़का देत होती.
शिवारातून सगळी माणसं कामं आटोपून वस्तीला घरी परतली तरी अजून तात्या कसा आला नाही म्हणून ..
म्हातारी चौकटीवर(दरवाजा) येऊन म्हणाली.
"आरं आन्या मोऱ्या कसा अजून आला न्हाय?"
मोऱ्या आला म्हणजे तात्या नक्कीच येणार याची म्हातारीला पक्की खात्री होती.त्यात तीला ऐकू कमी येत असल्यानं कुणी हळू बोलल्यालं तिला काहीच कळत नव्हतं.
त्यात मधघरात चुलीपाशी आई तात्याच्या नावाने खडं फोडीत होती.तिचा कंठ दाटून आला होता.अक्षरशः चुलितल्या इंगळाकड बघून घुटक्या गिळत होती.
पानावलेल्या डोळ्यांना पदरात मोकळ करत होती.
 न राहून म्हातारीनं इचारलच.
"अगं इमले मोऱ्या कसा अजून आला न्हाय??"
'ईचारा की लाडक्या नातवाला !'
आई आतूनच खेकासली!
पण म्हातारी नेहमीप्रमाण..'काय म्हणत्या र बाळी !?'
म्हणून माझ्यावर खवळली.
मी आपला.. आवंडा गिळत 
'मला न्हाई माहीत' म्हणत तिरस्काराने कुस बदलली.
तेवढ्यात...
बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आला तशी म्हातारी दिवा घेऊन चौकटीत बाहेर गेली .
बघत्या तर..
तात्या तांब्याची चैन ,चांगली जाडजूड घंटी..आणि लांबलचक कासरा घेऊन म्हातारीच्या म्होर आला.
म्हातारी चपापलीच! "काय रे बारक्या"(म्हातारी तात्याला लाडान बारक्या म्हणायची !)
'मोऱ्या कुठाय'?
तात्याच काय एक नाही की दोन नाही.
ऐकू न आल्यावानी करून सरळ दिव्यासकट म्हातारीला चौकटीतन आत ढकलली .
आणि हातातल्या वस्तुसहित कासरा माळ्यावर फेकला. 
तशी म्हातारी खवळलीच!
रक्तीची ह्यडेगिरी करतूया' 
"तू गबस्स " तात्या रागान वराडलाच!
म्हातारी काय खड फोडायची बंद हुयना!
आयन म्हजे काय चुलीपुढं उसनून उसनून डोळं लाल केल्यालं इंगळावाणी !..आणि मी कोरड पडलेल्या तोंडानं गप माच्यावर घुटक्या गिळत होतो.
सोफ्यातली चाहूल आयकून आईनं रागानच गरम केलेल्या पाण्याचा टोप सोप्याला आपटला.
तात्या दारातल्या दगड़ावर खकाऱ्या-वकाऱ्या काढून हात पाय धुयाला गेला.म्हातारीनं घराचा कोपरा शिव्यानं दणाणून सोडला होता.आई चुलिफुडं रागानं बोटं मोडत होती.कुणाला कुणाचा ताळमेळ न्हवता.मी आपला येड्यावानी नुसताच माच्यावर या कुशीवरून त्या कुशीवर तडफडत होतो
या सगळ्या गोंधळात सात-आठ पिल्याची कोंबडी खिरुड्यात कोंढायची विसरलेली म्हातारी कासूटा सावरीत पुन्हा दारात गेली.कोंबडीन कॉक कॉक करीत पकाखालच्या पिल्यास्नी सावध करून हळू-हळू सोप्याला मोर्चा वळवला.म्हातारीनं बचकन सात आठ कवळी पिल्ली कोपऱ्यातल्या खिरूड्यात कोंबली..आणि शिव्या घालीत कोंबडीच्या पकाला धरून म्हंत्या कशी..!
"कळवातने तुलाबी कळना व्हय लेकुरवाळी नवका सातच्या आत घरात यावं..नत काय."
कोंबडीलाबी कळनां आज म्हातारी का बिनासल्या !
चोराची गच्छांडी पकडुन जसा सळीच्या आत कोंबत्यात तशी अक्षशः कोंबडीला म्हातारीनं खिरूड्यात कोंबली ;
आणि वरनं पाटी झाकली.तेवढ्यात..
नाम्या कुत्रा दारातल्या पाटीतलं पाणी पिऊन धापा टाकीत सोप्याला येऊन शेपटी हालवत होता.म्हातारीन नाम्यावरबी दोन चार शिव्या हासडून तात्याचा राग काढला.ते आपलं एक नाही दोन नाही जिबळ्या चाटून माझ्याकड येऊन हुंगुन नेहमीच्या ठिकाणी जाऊन मान खोचून बसलं.
कुत्रं भाव देईना म्हणून की काय म्हातारीनं माझ्याकडे मोर्चा वळवला.आणि..
"तिन्हीसांच्याला झोपायला काय किरी लागल्या व्हय!'?
म्हणून माझ्यावर खेकासली. आणि लुगडं सावरत पुन्हा तिच्या आंथरूनावर जाऊन बसली.
तिकडं गोटयात मोऱ्या कसा आला नाही म्हणून गाय दवासन्या तोडत फुसफुसत होती.कोपऱ्यात भुंडी शेरडी आणि तिची दोन बकरी पण बेरडत होती.जनावरच असली तरी एकाच गोटयात दहा वर्ष एकत्र काढल्यावर..एखादा सवंगडी टायमात नाही आला म्हणून एकमेकासाठी हंबरत दवासन्या तोडताना याची देही याची डोळा पाहील होत.
आई आपली रागानं परातीत पीठ मळत गोळ करत भाकऱ्या थापत होती.हाताला चटकं सहन करून पोकळ बांबूच्या फुकणीनं चूल फुंकत होती. चुलीत लाकडं सारून सारखच शिव्या देत पदरानं नाक आणि डोळं पुसत होती.मी आपला आईकडं बघून पुन्हा दोन्ही कोपरात डोकं खुपसून कुस बदलायचो.आई आज काय गोठ्यात जाईल अस वाटत नव्हतं.
तात्यांन धुतलेले हात पाय पुसून सोप्याला शेरबर शेंगा वतून रतीब लावला होता..
कोपऱ्यात म्हातारी दिव्याच्या उजेडात बिब्यानं काटा लागलेला पाय शेकत होती.
मी आपला माच्यावर बसून बापा समोर ठेवलेल्या दिव्याच्या डोळ्यात डोळं घालून कल्पनेच्या जगात वातीवरून खाली उतरत होतो...अधून मधून आईच्या भाकरी थोपटण्याच्या
आवाजाने जाग यायची.पण... मोऱ्याचा विरह खूपच जिव्हारी लागल्यामुळं कानही आज बधीर झालं होतं.
मी आपला म्हातारीच्या सुईकडे एकटक बघत होतो.दिव्यावर तापवलेली लालबुंद सुई म्हातारी बिब्यात खोपसायची.चरर्र आवाज यायचा.तापलेल्या बिब्याचे चटके म्हातारी पायाला द्यायची.पण मोऱ्याच्या विरहाचे चरर्रर चटके माझ्या काळजात बसायचे.माझ्या डबडबलेल्या डोळ्यातून दिव्याची पेटती वात धूसर झाली.आणि... मी नकळत भूतकाळातल्या मोऱ्याच्या आठवणीच्या दिव्यात उतरणार एव्हढ्यात गोठ्यातून धड्ड्कन आवाज आला आणि मी भानावर आलो.जनावरांची धार अजून काढली न्हवती.हे आईच्या लक्षात आलं आणि आई चुलिबस्न खेकासलीच!
"आरं बापाला म्हणावं जी राहिल्यातय त्यांच्याक तरी बघ !"
नाहीतर ..बाजार करून टाक यकदाचा."
'मी काय गोठ्यात जाणार नाही ;सांगून ठेवत्या आत्ताच !'
गहिवरल्या स्वरातच ताकित दिली.त्यात मांजरान पण सुर मिसळला आणि आणि बिचारं भुकेनं व्याकूळ झालेलं आईचा पदर शेपटीन उडवायला लागलं.आईनं कसबसं डोळं पुसल आणि मला हाक दिली.परातीत हात धुवून भानवशिवर ठेवलेला दिव्याची तोटी काढून वात वाढवली.पुन्हा चुलीतल्या राखणं हात धून जरमनच्या ताटलीत दोन पळया कालवण वतून एक मऊसूत भाकरी मोडून माझ्या हातात दिली.मी म्हातारीच्या पुढ्यात ताटली दिली.म्हातारीनं बाकास (माचिस) वाटकान लावलं आणि गपगुमान भाकरी चुरुन खाया लागली .
तेव्हढ्यात पुढ्यातल्या शेंगा संपवून तात्या गोठ्यात गेला.कशीबशी गाईची धार काढली. 
आज गायनं रोजच्या पेक्षा एक तांब्या दूध कमीच दिलं होतं.
आता 'फक्त' गाय,वासरू,एक नवाट रेडी,एक शिर्डी आणि तिची दोन बकरीच गोठ्यात होती.
एवढी सगळी जनावरं असून देखील मी "फक्त" शब्द ज्याअर्थी वापरला त्यार्थी त्या गोठ्याला मोऱ्या विना अर्थच न्हवता.
त्याच्याविना गोठा कसा सूना सूना होता.हे तात्याला बहुदा उमगलं असावं म्हणून आईच्या विद्रोहाला कोणतंही प्रतिउत्तर न देता गपगुमान ताटावर येऊन बसला होता.
आईनं आम्हा तिघास्नी ताटं वाढून घेतली.
तिनं मनाविरुद्ध चतकोर भाकरी आवंडा गिळत कशीबशी पाण्याबरोबर खाऊन उरलेली तीन चतकोर भाकरी नाम्याच्या थाळीत कालवण वतून त्याच्या पुढ्यात सरकवली.आमच्या आधी मांजर मात्र दुधात भात खाऊन जिबळ्या चाटत होतं.
आईन एव्हढ होऊन ही घरातल्या सर्वांना वेळेत पोटभर खायला घालून स्वतः अर्धपोटी उठली होती. 
तिचही बरोबर होतं म्हणा ..
ज्याच्या कष्टानं दोन वेळच या घरात आलंय त्याचाच तुम्ही बेमालूमपणे सौदा केला असेल तर त्याच्या कष्ठाची कदर असणाऱ्या माणसाला घास घशाखाली जाणार तरी कसा.!?
तात्यांन मात्र दोन भाकरी मस्त दणकून खावून एक ढीकळा भात कालवून ताटलीत घेतला होता.
ह्यड्याच (जनावरांची खरेदी विक्री करणारा)तो!त्याला कसलं आलंय दुःख. 
मला काही घशाखाली घास उतरत न्हवता.पण भीतीपोटी पाण्याबरोबर आर्धीशी भाकरी गिळली होती.चुलीतल्या
लालबुंद इंगळासमोर आईचा चेहरा लैच तापला होता.कळत नव्हतं कुणी कुणाला फुलवत होतं.आणि आईनं गालावरचे ओघळणारे अश्रू हळूच पदराने पुसले..आणि लाल झालेल्या गालावर हलकीशी तीट लागली त्या लालबुंद इंगळाच्या उजेडात आई एकदम दुर्गामातेवानी दिसत होती.माझीच आई ती कश्टाच्या घामाच्या दागिण्या शिवाय काहीच शोभून दिसलंच नाही तिला.कारण.. बापानं केलेल्या तीन-तीन बोरमाळा हौसेन सनासुधीलाबी घालायला कधी मिळाल्याच नाही.शेतकऱ्याच्या बायकोचे दागिने तिच्या अंगावर कमी सोनाराकडेच जास्त.कारण मुलंबाळं,शेती औजारे,लग्न कार्य, लेकीची बाळंतपण,आजारपन हे म्हणजे संसारात दुष्काळातले तेरावे महिनेच !आई मात्र त्यांना पुरून उरायची.
आज मात्र ती पूर्णपणे हतबल आणि हताश झाली होती.
एका कर्त्याधर्त्या बैलाच भरल्या घरातून जाणं हे स्वाभिमानी कुटुंबप्रमुखाचे हात तुटण्यासारखच आहे !
काय असावं त्याच्यात ? का म्हणून यावी एवढी माया त्या मुक्या जीवावर ? असे अनंत प्रश्न माझ्या डोक्यात तांडव घालत होते.तेवढ्यात म्हातारीनं तात्याला हाळी दिली;
"बारक्या आरं मोऱ्याला वैरण टाकून ये"!
तशी आई तोंडात पदर दाबून हुंदका आवरायला लागली.आणि बापाच्या नजरेत नजर घालून दात ओठ खाऊ लागली.अक्षरशः डोळ्यात वणवा पेटला होता तिच्या.
अचानक आणि एव्हढा मोठा विद्रोह करणं किती मोठं धाडस होतं आईचं!
तात्याला काय आयच्या नजरेत नजर देता येईना !
त्यात मंगळवार लाईटच येणार न्हवती ! दिव्याच्या उजेडात सुध्दा थांबन तात्याला जड जात होतं.आईच्या नजरेला नजर द्यायला वाघाचच काळीज पाहिजे होतं.तात्या गुमान हात धून थेट बाहेरच्या माच्यावर गेला.लेंग्याच्या खिशातनं इब्राहिम बाबा काढली.खसाखसा मळली आणि मस्तपैकी विडा लावला.आणि.. दिलं ताणून माच्यावरच ! रातकिड्यांनी नुसती किरकिर लावली होती.मधेच पाल मोठ्याने चूकचुकायची.आईनं आपलं चुलीच्या बाजूला हात्रून केलं आणि वाकाळ घेऊन घुरमटून घेतलं.म्हातारी एकटीच कोपऱ्यात कन्हत होती .
आई मात्र हुंदके देऊन रडत होती 
मला हे काही सहन होत नव्हतं.बापाला एवढा निर्दयी पहिल्यांदाच बघून माझीही भितीनं तंतरली होती.बाकी काहीही केलं अस्त तरी चाललं असत पण तुम्ही तर मोऱ्याला विकून आमची इज्जतच विकली होती.
मी आपला 'मोऱ्याच्या आठवणी' डबडबलेल्या डोळ्यांनी चुलीतल्या इंगळाखाली शोधत होतो.
आमचा मोऱ्या म्हटलं की नाद करायचा नाही असं वर्णन!
मोऱ्या..! 
मोऱ्या म्हणजे एक चार पायाच जनावरच तर होतं .! बरं दिसायला देखणं होतं यातला पण काही भाग नाही पण हा नजर लागण्यासारख मात्र नक्की होतं ! टोकी शिंग,रुबाबदार वशिंड, बापाच्या खांद्यालाच लागायच पण...खाद्याला खादा देऊन काम करायच. रंगाच काय सेम पांडुरंगावानी !
चाल डौलदार, डोळे पाणीदार ,शेपूर झुपकेदार ,रुबाब मामलेदार !
एवढी विशेषनं ही कमीच होती आमच्या मोऱ्यासाठी तो एक बैल नव्हता तर आमच्या पडत्या काळात बळीराजाच्या बैलाच्या जोडीतला एकच बैल वामनानं आमच्या झोळीत टाकावा असच काहीतरी असावं ! 
जसजसं चुलितले इंगाळ उलथिन तसतसं गरम निखाऱ्यातून भूतकाळ ऊतु जाऊ लागला.
कौरवांनी एका सुईच्या टोकाएवढी जागा न दिल्यान जी अवस्था पांडवांची झाली होती.एव्हाना तशीच गत माझ्या बापाची झाली असावी.कारण;आई नांदायला आल्या आल्या थोरल्या चुलतीने मध घरात हक्क दाखवल्याने बाकीच्यांनीही आपापले हक्क बजावले.आम्च्या वाट्याला मात्र गाईचा गोठा आला होता.मोठ्या भावाचा जन्मच तिथं झाला अशा एकत्र कुटूंबात होणाऱ्या कुचंबना बघून बाबाच(वडिलांचे चुलते) बोलले... "बारक्या तू दोन खण बाजूला उतर"! आणि केलंही अगदी तसच!..आम्ही गोठ्यातून नवीन दोन खणात!आणि नवीन बैल गोठ्यात.अगदी थोड्याच काळात संसार बहरला.जोपर्यंत बाबा(पांडू पाटील वडिलांचे चुलते)होते तोपर्यंत घर कसं राम राज्यावानी चाललं होत.ते गावचे पंचवीस वर्षे पोलीस पाटील होते.आम्ही त्यांना बाबा म्हणायचो.
"पांडुरंग"नावाप्रमाणेच आख्ख्या गावाची माऊलीच जणू!
त्यांच ब्रीदवाक्य "आय आपली असली म्हणून न्याय आपला नसतो"! त्यासाठी तुम्हाला अन्यायाच्या विरोधी बंड पुकारावं लागतं. प्रसंगी रक्ताच्या नात्याला सुध्दा सुरुंग लागतात..पण द्वंद्वात टरकेल तो पाटील कसला? अहो सांगली जिल्याच शेवटचं टोक त्यानंतर पश्चिमेला प्रचीतगड चांदोली अभयारण्य.उत्तरेला सातारा जिल्हा बॉर्डर,दक्षिणेला उत्तुंग महादेव टोंगी ! कुठूनही या.. तुम्हाला १०-१२ किमी घाट चढून आल्याखेरीज पर्याय नाही असा आमचा' गुढेपांचगणी पठार' त्यातलं आमची ग्रामदैवत 'आसुबाई' तिच्या नावानं 'आसुबाई चे गुढे' म्हणून नावारूपाला येणं त्या देवीचीच पुण्याई म्हणा.जिथं १९८४ मिरज हून १२५ किलोमिटर एक 
डॉ.मधुकर विठ्ठल भोरे.पांडू पाटलाच्या शब्दाखातर येतो काय..!..आणि गावची सेवा इमाने इतबारे करतो काय..! किती भाग्य!त्याच डॉक्टर ला आपल्या घरात सोफ्याला राहायला देणारा पांडू पाटील.त्याच्या सख्ख्या पुतण्याला गोठ्यात राहायला लागू नये म्हणून घराच्या भिंतीला लागून जा सप्पर उतर अशी परवानगी देणारा पांडू पाटील.स्वतःच्या लेकीला चुकीचं वागल्या बद्दल चार चौघात कानफटात लावनारा पांडू पाटील.त्यांचं आमच्या सोबत मोजकीच वर्षे असणं आमचं भाग्यच!..नंतर चुलताचुलती,चुलतभाऊ,चुलतआजी आणि भावकीच्या डोळ्यात वळचणीचे दोन खण खुपाया लागले आणि व्हायच तेच झालं.प्रत्येक जन त्या समाईक जागेत वाटणी मागू लागले,मुद्दाम त्रास देऊ लागले.बरं..आत्ता पुन्हा त्या गोठ्यात राहण्याची मानसिकता आमच्यात राहिली नव्हती.कारण डॉक्टरला सोफ्यातून हाकलनं अशक्यच.(पांडू पाटलाचे संस्कार)नाईलाजास्तव आम्हाला त्रास नको म्हणून ते दोन खणाच घर सोडून आई-तात्याच्या जिद्दीनं बिराढ दुसऱ्या भावकीच्या सोप्याला विसावलं.अगदी दोन हत्तीवानी बैलांसहित! कष्टाच्या घामाने गोळा केलेला खिडुक मिडुक संसार आईला जपताना होणाऱ्या यातना पाहिल्यात मी या डोळ्यांन ! दुसऱ्याच्या सोप्याला जिद्दीन मांडलेला संसार बघून भली भली लोकं तोंडात बोट घालायची. स्वताच्या घरात असताना जेवढा संसार केला नाही त्याच्या डबल धान्याच्या राशी दुसऱ्याच्या घरात पाहून सख्ख्या नातेवाईकांचा तीळपापड व्हायचा.जिद्धी आईबापाच्या पोटी जन्म घेणं हे छत्रपतींच्या आशीर्वादाच प्रतिकच म्हणावं.कदाचित त्यांचीच प्रेरणा,तोच बाणा,तीच उर्मी, तीच चिकाटी घेऊन बाप 'सहा महिने गाव आणि सहा महिने मुंबई' अशा दोन्ही कासऱ्यावरून कसरत करत होता नजर मात्र ध्येयावर स्थिर होती हे मात्र तितकच खरं !
पण 'नजर लागली' ही अंधश्रद्धाच आहे! तरीही...तिला बदनाम करावंस वाटलच ! कदाचित आम्ही सुखाचे दोन घास खातोय हे नियतीच्या डोळ्यात खूपलं असावं म्हणून की काय आमच्या बैलजोडीतला "राजा" नावाचा सवंगडी वेळेच्या आधी कायमचा निखळला! आईने अक्षरशःउर बडवून आक्रोश केला.तिचा बाप मरतानाही एवढी रडली नसेल; तेवढी राजा जाताना रडली.म्हातारीनं तर लैच मनावर घेतलं.कसं व्हायचं माझ्या बारक्याच म्हणून 'रांडामेल्याच वाटोळं होऊदे'! म्हणून.. भावकीच्या नावानं बोटं कडा कडा मोडायची.तिला पहिलं कधीअशीच एकदा विषबाधा झाली होती म्हणून तिला शंका हीच की नक्कीच बैलालाबी(हातचं) तसच झालंय असा तिचा समज होता.आक्खी गल्ली तुंबली होती आईचा अवतार बघून.
गुलालाचा मळवट भरून आम्ही राजाला शेवटचा निरोप दिला.रात्रीच भावकीतल्या ७-८ जनानी राजाची पालखी गोटणीवर न्हेवून पोहोचवली. कुणीतरी बापाला मुंबईला त्याच्या शेटच्या दुकानात तार केली.बाप हातातली कामं टाकून मिळेल त्या गाडीनं डोंगराच्या पायथ्याला उतरून तिसऱ्या दिवशी रात्री बारा किलोमीटर डोंगर चडून गावात हजर.त्या रात्री आई बाप दोघंही राजासाठी हुमसून हुमसुन रडले.बाप त्या रात्री राजाच्या गवानितच बसला होता.त्याच्या डोक्यात राजासोबत केलेल्या कष्ठाचा रवथ चालू होता.
गुढघाभर चिखलात राब राब राबून राजा-शंकर बैलजोडीनं मिळून जवळजवळ एक खंडी धान्याची चिखलशेती केली होती.
चिखलशेती म्हटलं की भल्याभल्यांच्यां मणक्यावरनं भर पावसात घामाच्या धारा ढुंगनात उतरत्यात.अहो चिखलाचे बांध घालने म्हणजे काय पेस्ट्रीचा तुकडा अलगद तोंडात टाकण्या एवढा सोप्पा पराक्रम नव्हे.मुंबई-पुणे करणारी कोकणी,घाटी पोरं सिक्स पॅक बनवायला लावणीच्या मोसमात एक महिना गावी येत्यात.बापाची ही सुट्टी ठरलेलीच.झाली एकदाची भात लावणी.
श्रावणात उसंत म्हणून बापजाध्या कुरणात मनसोक्त चरायला सोडले राजा-शंकऱ्या दोघेही.
यंदा बेंदुरसण बापानं लैच हौसेनं केला होता.दिवसभर दोन्ही बैलांची शिंगे धारदार विळयानी टोकदार बनवून अंगावरची खराब लव तपकिरीच्या डब्याने अक्षरशः खरवडून काढली होती.पांढरेशुभ्र बैल जवा बाप धुवायचा तवा बैल इतके संतुष्ट व्हायचे की साक्षात बळीराजा त्यांना अंघोळ घालतोय की काय असाच भास त्यांना होत असावा.एकही गोचीड अंगावर दिसेल काय.! साधी सर्दी जरी झाली तरी लांब तोंडाच्या काचेच्या बाटलीनं औषध बाप बैलाच्या एका दाडेत वेसण धरून तोंडात कोंबत होता.माझ्या बापासारखा हौशी मी या जगात कुणी पाहिला नाही.जगात टेंभा मिरवायला कधी बैलं घेतली नाहीत.शेतीसाठी बैलं पण पोटच्या पोरावानी निघा.स्पर्धा स्वतःशीच !
पेंढीच्या गोणीच्या गोणी बैलांसाठी,गव्हाची कणीक पाड्या 
साठी.तो चांगला दिसावा म्हणून नव्हे तर त्यांनी औताला बसू नये.चांगल्यातली चांगली वैरण शिवरातून शोधून खायला घालणार.खात नसेल तर कसल्यातरी रानवेलीचा मुळ्या दुमडलेल्या भाकरीतून देताना मी खूपदा पाहिलंय.असा जिवलग बैलवाला इतर बैलानी कधी पाहिला नसेल.मी तर म्हणतो आमच्या बैलांकडे बघून भावकीतले बैलही त्यांच्या मालकांना पाहून द्वेषाने फुसफुसत असतील.कारण सकाळी तांबड फुटायला शेतात,ऊन डोक्यावर आलं की झाडाखाली काम कसं नियोजित.ना बैलांना कामाचा त्रास ना उन्हाचा !सगळं कसं ओकेच.पण नियतीला हे बघवलं नाही. राजाला न्हेऊन सगळंच वाटोळं केलं होतं.नंदी विना शंकराची तशीच गत राजाविना आईबापाची झाली होती.
राजाचं आमच्यातून जाणं बापानं लैच मनावर घेतलं होतं.पण दुखः कितीही ओसाड असलं तरी त्याला पद्धतशीर नांगर लावणं बापाला पक्क ठावं होतं.मुकाट्याने राजाच विरह गिळून पाटलानं मजबुरीनं पुन्हा मुंबई गाठली.
आई एकट्या शंकऱ्या ला शिवारातून नुस्त हिंडवून आणायची त्यो बी नीट खात नसायचा वर तोंड करून संपूर्ण कुरण फिरून यायचा.पण राजा काही केल्या त्याच्या नजरेस पडायचा नाही.
जनावरांना पण भावना असतात हो.. ! 
आईचं पण कशात लक्ष लागत नव्हतं.एका बैलाचा घरच्या सदस्यावानी सांभाळ केला होता.म्हातारीतर बैलाचा सारखा जोसरा काढायची.कारण तिच्या लेकाचा संसार फुलवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता.ती त्याच्यासाठी दररोज दोन मोठ्या पाण्याच्या बादल्या भरून ठेवायची.उन्हातनं औत घरी आलं की त्याच्या म्होरं सारायची.सायंकाळी सातच्याआत राजा ला पातेल्यात मीठ घालून पेंड आणि भाकरीचं तुकडं गोंजारून खायला घालायची .त्योबी म्हातारीचं हात चाटायचा.
म्हातारी म्हणायची:-"राजा माझ्या लेकाला सात दे बरं!"
त्योबी सुस्कारा टाकून व्हय म्हणायचा असच म्हातारी समजायची.भावकीपेक्षा बैलच तुझे भाऊबंद समज असं बापाला म्हणायची.अक्षरशःआई बापाच्या स्वभावामुळे म्हार्ड्यातल्या तरण्या ताट्ट्या मुलीच्या मुली आणि म्हाताऱ्या बायाबी मदतीला धावल्या.भात,भुईमुग,नाचणी, रोपा भांगलून,कोळपून गेल्या.घरच्यावानीच आईला काकी आणि बापाला तात्या म्हणायच्या.झालं दुःखात श्रावण संपला.सगळे सण सुतकावानी घालवले.
आई गौरी गणपतीलाबी म्हायारला गेली नाही.भातं नुकतीच आता फुलं प्यायला लागली होती..
बघता बघता घट बसले आख्ख्या गावात सणाचं वातावरण.घरटी बायांचे उपास,नऊ दिवस धुपारत्या,पाहुण्याची येजा,त्याचबरोबर निसर्गात पेरा पेरान गवत नऊ दिवसांत वाढण्याचे दिवस .ग्रामदेवता आसुबाईची नवरात्रीची जागर यात्रा प्रसन्न मनानं पोटापाण्यासाठी गावाबाहेर गेलेली चाकरमानी जातीनिशी हजर.गाव म्हंजे जणू पठारावरचं गोकुळच! 
झालं एकदाच शिलंगणाच सोनं लुटून !
गावातल्या शिलांगणाला जगात तोडच नाही.वडीलधाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्याना पाहुण्यांना प्रेमानं आलिंगन देण्यात स्वर्गच हो.
देवाला बांधलेली कडकणी खायची मजा काही औरच! 
झालं दसरा संपला.भात काढणीची तयारी.सणासुदीला आलेली सगळी लोकं शिवारात.जो तो आपली रात्री-दिवसा जमेल तशी भातं काढून खळ्यावर जमा करीत होता.कंबर कसून मळणी काढली आणि काय आश्चर्य!
यंदा काय कुणास ठाऊक खंडीला वर भात खळ्यावर साठलं.आईनं हळदी कुंकवाचा मान राशीला दिला.आणि आडसिरी भरायला डोक्यावर पदर घेतला ..तेवढ्याच क्षणात 
आईच्या डोळ्यात आभाळ भरून आलं आणि टचकन राजा च्या प्रेमाचा वळवाचा पाऊस खंडीभर भातात जिरला.आई खळ्यावरच राजाच्या आठवणीन रडायला लागली.माझ्या राजानं नवका चिखलाचं घास घेऊन रॉप लावली ;त्याच्या मेहनतीनं आज ही लक्ष्मी खळ्यावर आली.माझा पण कंठ दाटून आला होता ..तेवढ्यात बाप ओरडला !
"बाळे भरल्या राशीत रडू नको म्हणून सांगतूया"!
तसा आईनं पदरानं नाक डोळं पुसलंन आणि गपगुमान आडसिरीने भात पोत्यात भरायला लागली.पण आईच्या डोक्यातून काही केल्या राजाबैल जात नव्हता जवळजवळ पंचवीस पोती भाताच उत्पन्न त्या वर्षी झालं होतं.धरणी मातेनं मेहनतीनं फळ भरभरून दिलं होतं.शेतकरी जित्राप पण लेकरावानी सांभाळतो तेव्हा कुठं निसर्ग लाजेनं त्याच्या मेहनतीचं फळ गुमान झोळीत वततो.
मी तर म्हणतो..
शेतकऱ्याच्या कष्ठाच्या घामाच्या थेंबाचच बाष्पीभवन होऊन नभात ढगांची गर्दी ऐन मृग नक्षत्रात होत असावी.कड़ाडणाऱ्या विजानींही पेरनीचं स्वागत करावं.आणि धरतीच्या कुशीत गाडलेल्या बियानांच्या तोंडात तोच पहिला थेंब अलगद उतरावा आणि तिची कुस उजवावी.तिच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या प्रत्येक जीवाचं पोट भरून त्याचा उद्धार व्हावा म्हणूनच "जगाचा पोशिंदा" म्हणून नामकरण शेतकऱ्याच्या नशिबी यावं याहून भाग्य ते काय!
भारत कृषिप्रधान देश आहे या वाक्याची रचना,कल्पना करणारी एक शेतकऱ्याचीच अवलाद असणार यात काही शंका नाही.आम्हीबी शेतकऱ्यांच्याच अवलादी नाहीतर एका बैलाविषयी एव्हढ प्रेम कुठून पैदा हूतय तवाते!
आईने खळ्यावर भरलेली धान्याची पोती घरातल्या टोपल्यात रीती झाली.त्यात कसार होऊ नये म्हणून निलगिरीच्या पानाने झाक ली.त्यांना शेणाने सारवून त्यावर  चुन्याने स्वस्तिक चिन्ह काढून लाकडी माचावर ठेवली होती.पुन्हा घवळीच्या पेरणीची तयारी...
पण बैल मात्र एकच
कशी करायची पेरणी ???
ऐन घातीत कोण आपलं सोडून दुसऱ्याला बैल कसा देणार ?
आणि समद्या गावात सगळ्यांची दोन दोन बैलं.आम्ही आपला एकटा शंक्र्या घेऊन काय करायचं होतं.
तरीबी ...
आय- बाप एका बैलासाठी पैरा करायला दारोदार फिरले..
पण सगळं व्यर्थ !
अक्षरशः घवळीला आलेलं शेतं घात संपल्यावर पेरली.ती उगवलीच नाही.मनासारखी पेरणी न झाल्यामुळे बाप आणि आई हतबल झाली.राजाचं नसणं म्हणजे अर्धांगवायूच!
शिमग्याच्या होळ्या पेटल्या.संपूर्ण शिवार मोकळा झाला.
यावर्षी ज्यांची पेरणी उत्तम झाली होती त्यांची मज्जाच !
प्रत्येकांनी मजबूत शाळू, गहू, हरबरा,इतर पिके काढली आणि आपली जनावरं उंडगी हिंडायला शिवारात सोडली. कारण पुढील तीन चार महिने पठारावर काम ना धाम! बायकांना नुसत्या हातावर वाकळा शिवणे आणि गडी देवळात पत्ते पिसने एवढच काय ते काम.
गुढेपांचगणीपठाराला चारी बाजूंनी डोंगरांची तटबंदीच.
त्यातच गवतासाठी राखून ठेवलेली पाच एकरची डाग कुणी आग लावून जाळून टाकली.दुष्काळात तेरावा महिना तसचं झालं आणि बापानं शंकरला पण देऊन टाकला. 
आमचा गोठा मात्र आता फोंड्या माळावानी वसाड पडला. एकुलती एक भूंडी शिरडी आपली भाकडून थांबलेली. जनावराविना गोठा नुसता नुसता जीव खायला उठायचा.
पण आई मात्र नित्य नेमाने गोठा लोटून काढायची.तिला इतका विश्वास नक्की होता एक दिवस आपलं जनावर नक्की गोठ्यात येणार.त्याची ती आतूरतेने वाट पहायची.
खरंतर एव्हढा मोठा संसार दुसऱ्याच्या ओसरीवर किती दिवस थाटणार..म्हणून बापाने गणपा पाटलांच्या शेजारची दोन गुंठे जागा घेऊन बाप घराचं स्वप्न सत्यात उतारायच्या तयारीला लागला होता.म्हातारीपण लई खूष होती.कि माझ्या लेकाच स्वःतच घर होणार ! 
पण..
'नियत सुध्दा निर्भय माणसाचीच परीक्षा घेते'.
खरेदी केलेल्या जमिनीला स्टे ऑर्डर देऊन घराचं काम काजाऱ्यांनी थांबवलं.आमच्यासहित म्हातारीच्या स्वप्नाचा चक्काचूर केला.
त्या जागेत बांधेलेलं शेड सुध्दा निकाल व्हायच्या आत विरोधकांच्या भावकीनं तोडलं.
'वाईट काळात आधार देणारी भावकीपण अदृश्य होते' हे आईबापानं डोळ्यादेखत अनुभवलं.
पण माघार घेणं माझ्या आई बापाच्या रक्तातच नव्हतं.
कायदेशीर लढाई लढून जिंकलं.विरोधकांनी मात्र जे होतं ते सुध्दा गमावलं होतं.निकाल आमच्या बाजूनं लागला.आणि
पुन्हा नव्या दमानं आम्ही आहे त्या जागेत नाकावर टिच्चून कुडा-मेडीच का होईना घर उभारलं.आमच्या पेक्षा आमच्या म्हातारीचा आनंद अनंत आकाशगंगेत मावणार नाही एव्हढा ओसंडून वहात होता.तिच्या लेकाला जेव्हा हक्काच्या घरातून बाहेर काढताना जेवढ्या वेदना झाल्या होत्या तेव्हढ्या वेदनांवर ही जणू थंडगार वाऱ्याची झुळुकच होती.
निवाऱ्याविना काय ससेहोलपट होते हे माझ्या आईनं जानलं होतं.आता कुठं सासू सूना गुण्यागोविदानं नांदत होत्या."छप्पर मे महल की खुशबू"च जनू !
कसंही असलं तरी तुमचं हक्काचं घर हे तुमच्यासाठी राजमहालच असतं.
आता नवीन सप्परात आकसून जगणं सोडलं होतं.बिनधास्त अगळपगळ जगणं चालू होतं.कमी होती ती फक्त एका सदस्याची.एका बैलाची!
कारण राजाशंकऱ्या जोडीतला राजा गेल्यानंतर शंकऱ्यालाच तर मजबुरीने विकून आमचा आशियाना उभा राहिला होता.आणि म्हणूनच तर त्यात देव्हाऱ्या आधी बैलाचा गोठा तयार होता.फक्त त्या गोठ्यात शंभूनारायण कोणाला पाठवणार होता ते त्यालाच माहीत होतं.गावात आता जास्तीत जास्त लोकं पैऱ्यांन शेती करत होती त्यासाठी किमान एक बैल तरी असणं बंधनकारक होतं.
पठारावर चाऱ्या अभावी भाकडलेली जनावर खसापाला
घालण्याची कामं म्हारवड्यातील काही लोकं गुपचूप पणे करायची.हे बापाला ठावं होतं.
असच एकदा 
राजा कांबळे बापाला बोलला "तात्या एक वासरू खसापाला पण घेईनात बघताका एकदा"! 
असं ऐकल्याबरोबर तात्यान चटकन खांद्यावर चाबूक घेऊन म्हारवड्याकडे कूच केली.अजूनही आठवतंय सायंकाळी लक्ष्मीच्या पावलांन वासरानं आमच्या घरात उजवा पाय टाकला होता.नवं घर (छप्पर)नवा गोठा, नवा बैल नाव फक्त जुनं मोऱ्या ते मोऱ्याच!
बापाला बैलाच राजा नाव ठेवायची लै हौस.
पण राजा नावाच्या माणसानं बैल दिल्यामुळं तो ज्या नावानं हाक मारत होता त्याच नावानं आम्हीही त्याला बोलवायला लागलो.तोही आमच्यात मानसाळला.
जसं खूप वर्षांनी एखाद्या घरी बाळ जन्माला यावं तितका आनंद आमच्या घरी ओसंडत होता. त्याचं आमच्या घरी येणं इतकं शुभ होतं की त्याच्या येण्यानं घराच गोकुळ झालं होतं.
साडेसातीचा काळ संपून कधीच गेला होता.त्याच्या पायगुनाने झालेला कायापालट माझ्या नजरेसमोरून फ्लॅशबॅक सारखा पळत होता.
मोऱ्याच्या गळ्यातील घंटीचा आवाज मला काही झोपू देत नव्हता.सारखा कुस बदलून त्याच्या आठवणीत तळमळायचो.
अजूनही आठवतंय एकदा लोखंडी साप्त्याचे वळ मोऱ्याच्या अंगावर बघून आईने मला कुत्र्यासारखा मारला होता.एक दिवस उपाशी झोपवला होता.लेकरांप्रमाणे कैक पटीन जनावरांवर जीव लावणारी माऊली म्हंजे माझी आई.
मोऱ्या म्हंजे दत्तक घेतलेलं पोरच जणू!
आणि त्याच पोराचा सौदा त्या माऊलीला विचारात न घेता केला असेल तर काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची!??
अक्षरशः विकला होता मोऱ्याला ! पंचवीस हजाराची रोकड घेऊन बाप सपनात बैलगाडा पळवत होता.
कोपऱ्यात म्हातारी चावळत होती.आईच्या हुंदक्यानं घर डोक्यावर घेतलं होतं.मी आपला या कुशीवरून त्या कुशीवर उगाचच झोपायचा प्रयत्न करत होतो. विचारांच काहूर झोप लागू देत नव्हतं.
एरव्ही म्हातारीच्या कुशीत झोपणारा मी आज एकटाच माचावर धडपडत होतो.
ताडकन उठलो ते लागलीच म्हातारी कडे गेलो.म्हातारी पण जागीच होती.तिनं ओळखलं पिल्लू पखाखाली आल्या शिवाय झोपत नाही.कुशीत गेल्या गेल्या असंख्य विजा कडाडल्या..मनातलं आभाळ भरून आलं..क्षणात हुंदका सुटला...आणि धो धो ढगफुटी व्हावी तशी म्हातारीच्या पदरात माझं विरहदुःखरुपी धरण ओसंडून वाहू लागलं.
म्हातारी चापापलीच!
मध्यान रात्री पोर एवढं का रडतंय 
म्हणून दिवा पेटविला..आणि काय झालं म्हणून डोळं पुसायला लागली.तिला वाटलं पोटात दुखतय म्हणून पोट चोळायला लागली.
पण मी बापाकड बोटं दाखवून रडायला लागलो.
मोऱ्या ! मोऱ्या ! मोऱ्या पाहिजे मला.
म्हणून हंबरडा फोडला.माझा आवाज ऐकून आई मधल्या चौकटीत येऊन तोंडात पदर घेऊन रडत होती.
तिकडं खिरुड्यात कोंबडीन म्हंजे काय नुसता केक्टून रात्रीची शांतता भंग केली होती.पाल मधेच चुकचुकत होती रातकिड्यांचा नुसता किरकिरात चालू होता. म्हातारीनं शिव्या देऊन बापाला उठवला.
खांडाआड लपवलेला टॉगलस्विच दाबून लाईट लावली शंभर वॉट च्या बलात आखं घर घर उजळून निघालं.
 बाप रागान नुसता लालेलाल झाला होता.
"काय झालंय तुम्हास्नी" म्हणून आरोळी ठोकली.
पण म्हातारीच्या भरलेल्या डोळ्यांकड आणि रडवेल्या चेहऱ्याकड बघून बाप गळपाटला.
आईवरून शिवी देणाराची चामडी लोळवणारा बाप 
आईच्या डबडबत्या डोळ्यातल्या अश्रुंच्या फक्त दर्शनाने शांत नाही होणार तर कोणाच्या ! लहान मुलावानी मान खाली घालून पायाच्या अंगठ्याने भुई टोकरत होता.म्हातारीनं ताकिद दिली.
"बारक्या गुमांन बैल घरात आन नायत मी मोठ्या लेकाक गावात जातू ! आणि बाळीबी उद्याबस्न हित थांबणार नाय !"
मी म्हातारीच्या पायात बसलो होतो .. उसणत होतो ..चोरून बापाच्या डोळ्यात डोळं घालत होतो.त्यांची नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती.माझ्या अश्रूंना काय उत्तर देऊ म्हणून बापाच मन भरून आलं होतं.कदाचित माझ्या गालावरील ओघळणाऱ्या अश्रूत मोऱ्याने कुटुंबासाठी केलेल्या कष्टाचा फ्लॅशबॅक दिसला असावा.
म्हणूनच अक्षरशः बापाच्या डोळ्यातून आसळका बरसू लागल्या होत्या.मुसळधार पावसात चिकलशेती करताना एकदा भरपावसात मोऱ्या दमून चिखलात बसला होता.औकातीपेक्षा जास्त ओझ दिल्याचं दुःख बापाला तेव्हा झाल होतं आणि तीच पहिली आणि शेवटची वेळ बसायची.त्यानंतर..बापाचा संसार उभा केला पण पुन्हा कधी चिखलात बसला नाही मोऱ्या.
माणसाने उपकार विसरले की मग राहिलंच काय त्या जगण्यात! अश्रूंचा सडा पडला अक्षरशः मोकळा झाला बाप दुःखाचं काळवंडलेल आभाळ मोकळं झालं. 
निरभ्र आभाळात पाहून जसं वाटतं अगदी तसचं बापाला वाटलं असावं.कारण त्यांनी बैल कधी शर्यतीसाठी घेतली नाहीत.शेतात कष्टासाठी झटणाऱ्या बैलाला शर्यतीत पळविणाऱ्याला कसला आसुरी आनंद मिळू शकतो?मुळात ती शेतकऱ्याची औलाद असूच शकत नाही.तुम्ही तुमची इच्छा नसताना दारू भांग पाजून एखाद्या शर्यतीत पळवलं..तर काय वाट्टेल तुम्हाला.?
बैलगाडा शर्यत तुमची तुम्हाला लकलाभ.
अहो जो तुमच्यासाठी धावतो त्याला हे पण माहीत नसत की मालक क्षणभंगुर विजयाच्या आसुरी आनंदासाठी आपल्या तांगड्या तांनतोय!
अहो तुमचं क्षणिक सुख जनावराच्या त्रासाच कारण होत असेल तर आग लागो त्या सुखाला.अशी किती लोकांची पोट भरतात बैलगाडा शर्यतीने ? पळणारा पळतो त्याला पळवणारा पळायसाठीच पाळतो.जवा पळणारा थकतो तवा पाळनाराबी हिशेब बघतो.जवा हिशेब चुकतो तवा पळणारा पाळणाऱ्याला मुकतो.तसं आमचं नसतं शेठ!
शेतकऱ्याची आख्खी पिढी बैलावर जीव ओवाळून टाकते.हीच गोष्ट बापाला आम्हा तिघांना बघून पटली आणि तडक शिडीवर चढून माळयावरल्या पिशवीत काहीतरी टाकून घराबाहेर गेला.दाराचा आवाज ऐकून कुत्रं पण उठून बापाच्या मागोमाग गेलं.लगबगीने म्हातारी आणि आई त्याच्या मागोमाग गेली.पण बाहेरून दाराला कडी लावून घेतली.
म्हातारी.. "बारक्या कुठं जातूयस" राचा इरचा !
आई पण "आव कुठं जातायसा सांगा की " बाप एक नाही दोन नाही तडक अंधारातून कूच केली.मी आपला म्हातारीच्या अंथरुणावर बसलो होतो.आईं म्हातारीला घेऊन माझ्या जवळ आली.लाईटच बटन बंद केलं आणि म्हातारीच्या चुलीच्या भांनवशीवरचा दिवा लावला.दोघीनी कधी नव्हे ते त्या रात्री एकमेकीकडे मिसरी मागून थोडी थोडी लावली.मी म्हातारीच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपलो होतो.आई माचावर जाऊन थोडी कलांडली त्यांनतर काय झालं माहीत नाही..तिघांची कधी झोप लागली कळलंच नाही.
अचानक जाग आली .....
चिमण्यांचा चिवचिवाट ....उगवत्या बाजूला भगवा रंग फेकायची तयारी ...हळू हळू वातावरणात चैतन्य संचारल.मंद वारा सकाळी सकाळी झाडांना गुदगुल्या करायला लागला.
तांबड फुटलं...संपूर्ण सृष्ठीन आळस मोडला .. झाडांच्या आंगाखांद्यावर पाखरं खेळायला लागली..कुणी उंच भराऱ्या मारायला लागली.घरामागच्या वड्यावर खळखळ धबधबा गाणं म्हणत होता....तेवढ्यात .. दारात ओळखीच्या घंटीचा आवाज....म्हातारीनं चूल पेटवून पाणी तापत ठेवलं होतं.आणि मिश्रीच्या बोटांन दाडांची मालिश करीत होती. तिला बाहेरच काही ऐकू येत नव्हतं.ओळखीच्या वाटणाऱ्या त्या घण्टीन आईला उठवलं..ताडकन आई उठली डोक्यावर पदर घेतला ....
मी पण आईच्या पाठीमागे जाऊन थांबलो.बाहेरून कुणीतरी कढी उघडली .आईनं दार उघडलं समोर बघत्यातर ..मोऱ्या.
गळ्यात सोन्यावानी पितळेची साखळी ...त्यात खणखणीत घंटी .. काळा कंठा,...सुताची वेसण ,डाव्या पायात काळा दोरा ..रुबाबदार वशिंड उडवत .थांबला होता.. आईनं जाऊन मिठीच मारली. डोक्यावरन हात फिरवला..बाप आपला कमरवर हात ठेऊन ..आईचं कौतुक बघत होता ..मी जाऊन आईच्या पदराला चिकाटलू...आईनं मला बाजूला सारलं आणि पळतच घरात गेली...मी जाऊन बापाच्या हातातला कासरा हिसकावून घेतला.बापानं माझ्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवला.
तेवढ्यात आई घरातनं...एका हातात भाकरी आणि त्यावर लालभडक चटणी दुसऱ्या हातात तांब्या भरून पाणीघेऊन आली. आर्धी भाकरी डाव्या बाजूला आर्धि उजव्या बाजुला मोऱ्यावरन उतरून टाकली ...नजरच काढली ..मोऱ्या बी नुसता कौतुकानं आईकड बघत होता...तेवढ्यात म्हातारी कासुटा सावरीत कोंबडीच खिरुड घेऊन दारात आली.कुत्रं म्हातारीला बघून शेपटी हलवायला लागलं.त्यालाबी कळलं असावं मोऱ्या आलाय म्हंटल्यावर म्हातारी आता खुश होणार.म्हातारीनं खिरूड उलट केलं तशी पिल्यांसहित कोंबडी आळस झटकून अंगणात गेली. म्हातारीनं तात्याच्या हातातली नेहमीची पिशवी हिसकावून घेतलीन म्हणाली
"हेडीगिरी करतूया" !..
'बिनकामाचा घरात मरुदे !पण इकु नको.'
'जा पाणी तापलय.. आंगुळ करून घे.!' म्हणून परसाक गेली.
तात्या हसायला लागला.
आई चौकटीतन ... मोऱ्याक बघत होती ..चोरून बापाक बघून हसून लाजली न तोंडात पदर घेऊन घरात निघून गेली.बापही पाठोपाठ घरात गेला.मी आपला अंगणात मोऱ्यासंग खेळत होतो.
प्रसन्न सकाळ ..गावातील लोकं शिवारात जात होती..कुणी खांद्यावर कुदळ,टिकाव, खोरं घेऊन तर बाया माणसं डोक्यावर पाटी ,त्यात पाण्याची कळशी जेवण ,खुरपी विळा 
घेऊन निघाली होती. बापय गडी बैल गाड्या सोबत वैरण घेऊन चालली होती ..तर काही बाया हातात एखादी शेळी.गायम्हशी घेऊन शिवाराच्या दिशेने लगाबगा जात होत्या.हे सगळ दृश्य इतकं भारी वाटत होतं की एका बैलाच्या असण्यानं आमचं शेतकरी म्हणून रुबाबात जगणं किती मोलाचं होतं.म्हणून शेतकऱ्याची जनावरं ही त्यांचे घरचे सदस्यच असतात ..ते फक्त मुके असतात..पण डोळ्यांनी ते बोलतात.फक्त आपल्या नजरेत प्रेम हवं. शेतीकडं बघण्याचा दष्टीकोन बदलण्याची ताकत एका जनावरात आहे हे तेव्हा कळलं ..म्हणून मोऱ्या हा आमच्यासाठी एक हमसफरच होता..ज्यानं आमचं आयुष्यच बदललं होतं ..नवीन बदलणाऱ्या जगासाठी!
मिस यू मोऱ्या !♥️




टिप्पण्या

  1. अप्रतिम. .
    साक्षात ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या मोऱ्याला लावलेला जीव ... शब्द रचना ते वर्णन सर्व कसं ok मध्ये आहे👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तू तशीच रहा..

बायकॉट